वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी
नशिबी दगड गोटे
काट्याकुट्याचा धनी
पायाले लागे ठेचा
आलं डोयाले पाणी
वरून तापे उन
अंग झाले रे लाही
चालला आढवानी
फोड आले रे पायी
जानच पडीन रे
तुले लोकाच्यासाठी
वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी
दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट
उतार चढणीच्या
दोन्ही सुखदुखात
रमव तुझा जीव
धीर धर मनात
उघडू नको आता
तुझ्या झाकल्या मुठी
वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी
माझे भाऊबंद घाइसनि येतीन
नको धरू रे आशा
धर एवढ ध्यान
तुझ्या पायाने जानं
तुझा तुलेच जीव
लावनी पार आता
तुझी तुलेच नाव
मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी
वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी
वारयाचं वाह्दन
आलं आलं रे मोठं
त्याच्यात झुकीसनी
चुकू नको रे वाट
दोन्ही बाजूनं द-या
धर झुडूप हाती
सोडू नको रे धीर
येवो संकटं किती
येऊ दे रे परीचीती
काय तुझ्या ललाटी
वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी
No comments:
Post a Comment