माहेर

बापाजीच्या हावेलीत 
येती शेट शेतकरी 
दारी खेटराची रास 
घरी भरली कचेरी 

गावामधी दबदबा 
बाप महाजन माझा 
त्याचा काटेतोल न्याव 
जसा गावामधी राजा 

माय भिमाई माउली 
जशी आंब्याची सावली 
आम्हाइले केलं गार 
सोता उन्हात तावली 

तुझे भाऊ देवा घरी 
नही मायबाप तुले 
तुले कशाचं माहेर 
लागे कुलूप दाराले 

भाऊ घमा गाये घाम
गना भगत गनात 
घना माझा लिखनार 
गेला शिकायाले धुयात 

आम्ही बहिणी आह्यला 
सीता तुयासा बहिणा 
देल्या अशिलाचे घरी 
सगेसोइ मोतीदाना 

लागे पायाला चटके 
रस्ता तापीसानी लाल 
माझ्या माहेरची वाट 
माले वाटे मखमल 

जीव व्हतो लाही लाही 
चैत्र वैसखाच उन 
पाय पडता लौकीत 
शीन जातो निंघीसन 

तापीवानी नाही थडी 
जरी वाहे थोडी थोडी 
पाणी लौकिचं नित्तय 

 त्याले अम्रीताची गोडी

माहेरून ये निरोप 
सांगे कानामंधी वारा 
माझ्या माहेरच्या खेपा 
लौकी नदीले इचारा 


3 comments:

  1. खूप छान ब्लाँग.
    बहिणाबाईंच्या कविता एकत्र वाचायला मिळाल्या.

    ReplyDelete
  2. खूप छान ब्लाँग.
    बहिणाबाईंच्या कविता एकत्र वाचायला मिळाल्या.

    ReplyDelete