कशाले काय म्हनू नही


बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनू नही
हरी नामाइना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वाऱ्याने हाललं त्याले पान म्हणू नही
नही ऐके हरिनाम त्याले कान म्हणू नही


पाटा येहेरीवाचून त्याले मया म्हणू नही
नही देवाचं दर्सन त्याले डोया म्हणू नही

निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणू नही
आखडला दानासाठे त्याले हात म्हणू नही

ज्याच्यामध्ये नही पानी त्याले हाय म्हणू नही
धावा ऐकून अडला त्याले पाय म्हणू नही

येहेरीतून ये रीती तिले मोट म्हणू नही
केली सोताची भरती त्याले पोट म्हणू नही

नही वळखला कान्हा तिले गाय म्हणू नही
जीले नही फुटे पान्हा तिले माय म्हणू नही

अरी वाटच्या दोरीले साप म्हणू नही
इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणू नही

दुधावर आले बुरी तिले साय म्हणू नही
जिची माया गेली सरी तिले माय म्हणू नही

इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नही
जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही

ज्याच्यामधी नाही भाव त्याले भक्ती म्हनु नही
ज्याच्यामधी नाही चेव त्याले शक्ती म्हणू नही


8 comments:

  1. अतिशय आशयपूर्ण कविता.

    ReplyDelete
  2. बहिणाबाई चौधरी यांनी या कवितेत "घागरीत सागर भरला" गुरु उपदेश आहे हा...! नमन त्या माऊलीला!

    ReplyDelete
  3. सुंदर अशा कविता आहे.

    ReplyDelete
  4. Where in question answer

    ReplyDelete