देव अजब गारोडी

धरीत्रीच्या कुशीमधी 
बी बियानं निजली 
वऱ्हे पसरली माटी 
जशी शाल पांघरली 

बी टरारे भुईत
सर्वे कोंब आले वऱ्हे 
गय्ह्रले शेत जसं 
अंगावरती शहारे 

उन वार्याशी खेयता 
एका एका कोम्बातून 
पर्गटले दोन पानं 
जसे हात जोडीसन 

टाया वाजवती पानं 
दंग देवाच्या भजनी 
जसे करती कारोन्या 
होऊ दे रे आबादानी 

दिसामासा व्हये वाढ 
रोप झाली आता मोठी 
आला पिकाले बहर 
झाली शेतामधी दाटी 

कसे वारयानं डोलती 
दाने आले गाडी गाडी 
दैव गेलं रे उघडी 
देव अजब गारोडी 


2 comments: