देनं घेणं

नको लागू जीवा, सदा मतलबापाठी 
हिरिताचं देनं घेणं नही पोटासाठी 

उभे शेतामधी पीक 
उन वारा खात खात 
तरसती, केव्हा जाऊ 
देवा भुकेल्या पोटात 

पेटवा रे चुल्हा आता, मांडा ताटवाटी 
 नको लागू जीवा, सदा मतलबापाठी

पाहीसनी रे लोकाचे 
यवहार खोटे नाटे 
तवा बोरी बाभयीच्या 
आले अंगावर काटे 

राखोयीच्यासाठी झाल्या शेताले कपाटी 
नको लागू जीवा, सदा मतलबापाठी 

किती भरला कनगा 
भरल्यानं होतो रिता 
हिरिताचं देनं घेणं 
नाही डाडोराकरिता 

गेली देही निन्घीसनी नाव रे शेवटी 
नको लागू जीवा, सदा मतलबापाठी

No comments:

Post a Comment