लपे करमाची रेखा

लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खाली 
पुशिसनी गेलं कुंकू 
रेखा उघडी पडली 

 देवा, तुझ्याबी घरचा 
झरा धनाचा आटला 
 धन रेखाच्या च-यानं 
  तयहात रे फाटला 

बापा, नको मारू थापा 
असो ख-या असो खोट्या 
नही नशीब नशीब 
तयहाताच्या रेघोट्या 
 
 अरे नशीब नशीब 
 लागे चक्कर पायाले 
नशिबाचे नऊ गिऱ्हे 
 ते भी फिरत राह्यले 

राहो दोन लाल सुखी 
हेच देवाले मागनं 
त्यात आलं रे नशीब 
काय सांगे पंचागन 

नको नको रे जोतिशा 
नको  हात माझा पाहू 
माझं दैव माले कये 
माझ्या दारी नको येऊ. 

No comments:

Post a Comment