जीव देवाने धाडला जल्म म्हणे आला आला
जेवा आलं बोलावनं मौत म्हणे गेला गेला
दिस आला कामामधी रात नीजमधी गेली
मरणाची नीज जाता जल्माची जाग आली
नही सरलं सरलं जीवा तुझ येनं जानं
जसा घडला मुकाम त्याले म्हणती रे जीनं
आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर
अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर
येरे यरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीचं रूप
ऐक ऐक माझ्या जीवा पीड्लेल्याचं कन्हनं
देरे गान्जाल्याले हात त्याचं ऐक री म्हननं
अरे निमानतोंडाच्या वढ पाठीवरे धांडा
नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेन्डा
हास हास माझ्या जीवा असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या तोंडावरे कायं फास
जग जग माझ्या जीवा असं जगनं तोलाचं
उच्च गगनासाराख्या धरत्रीच्या रे मोलाचं
No comments:
Post a Comment