संग्रह

 कडू बोलता बोलता 
पुढे कशी नरमली 
कडू निम्बोया शेवटी 
पिकीसनी गोड झाली 

-------------------------------------

फाट आता आता टराटरा 
नही दया तुफानाले 
हाले बभयीचं पान 
बोले केयीच्या पानाले 
---------------------------------------

 हिरवे हिरवे पानं 
लाल फयं  जशी चोच 
आलं वडाच्या झाडाले 
जसं पीक पोपटाचं 
---------------------------------------
पयसाचे लाल फुलं 
हिरवे पानं गेले झडी 
इसरले लाल चोची 
मिट्ठू  गेले कुठे उडी ?
---------------------------------------
 घाम गायता गायता 
शेतकरी तरसला 
तव्हा कुठे आभायात 
मेघराया बरसला 
---------------------------------------
धरितीवरिली   हिरवय 
गेली उडत उडत 
अरे उडता उडता 
झाली नियी आभायात 
---------------------------------------
उठा उठा बहिणाबाई 
बोंडं कपाशीचे येचा 
बोटं हालवा हालवा 
जशा पाखराच्या चोचा 
--------------------------------------- 
जेवा  इमान सचोटी 
पापामधी रे बुडले 
 तव्हा  याच माणसानं 
किल्ल्या कुलूप घडले 

किल्ल्या राहिल्या ठिकाणी 
जव्हा तिजो-या फोडल्या 
तव्हा  याच माणसानं 
बेड्या लोखंडी घडल्या
---------------------------------------
  माझं दुखं, माझं दुखं, 
जशी अंधारली रात 
माझं सुख, माझं सुख 
 हातातली काडवात 

  माझं दुखं, माझं दुखं, 
तयघरात कोंडले 
माझं सुख, माझं सुख
हंड्या झुंबर टांगले 
---------------------------------------
 अरे देवा तुझं घेणं 
काही नही काही नही 
तुझ्या पुढचा निवद 
माणूसच जातो खाई 
--------------------------------------- 
 गानं आलं कानामधी 
बुगडिले काय त्याचं?
वास गेला नाकामधी 
नथनीले  काय त्याचं ?
---------------------------------------
सोता झाला रे आरसा 
असा मनाचा जो साफ 
तठे कशाचं रे पाप 
त्याले सात गुन्हे माफ 
---------------------------------------
देखा महारवाड्यात 
कशी माणसाची दैना 
पोटामधी उठे आग  
चुल्हा पेटता पेटेना 
---------------------------------------
आता चला जरा पुढे 
भट्टी दारूची लागली 
तठी भंगड दुनिया 
जिती अशीसन मेली 
---------------------------------------

चाले छाप्याचं यंतर 
जीव आठे भी रमतो 
टाकीसनी रे मंतर 
जसा भगत घुमतो 

माणसापरी माणूस 
राहतो रे येडजाना 
अरे होतो छापिसानी  
कोरा कागद शहाणा 

---------------------------------------
सोन्यारुप्याने मढला 
मारवाड्याचा बालाजी 
शेतकऱ्याचा इठोबा 
पानाफुलामध्ये राजी 

अरे बालाजी इठोबा 
दोन्ही एकज रे देव 
श्रीमंतीने गरिबीनं 
केला केला दुजाभाव 

धरत्रीले दंडवत

काया काया शेतामधी 
घाम घाम जिरव 
तव्हा उगलं उगलं 
कायामधून हिरवं 

येता पिकाले बहर 
शेताशेतात हिरवय 
कसं पिकलं रे सोनं 
हिर्व्यामधून पिवयं

अशी धरीत्रीची  माया
अरे तिला नाही सीमा 
दुनियाचे सर्वे पोट 
तिच्यामधी झाले जमा 

शेतामधी भाऊराया 
आला पीक गोंजारत 
हात जोडीसानी केला 
धरीत्रिले दंडवत 

शेतामधी भाऊराया 
खाले वाकला वाकला 
त्यानं आपल्या कपायी 
टिया मातीचा लावला 

अशी भाग्यवंत माय 
भाउरायाची जमीन 
वाडवडीलांचं देवा 
राखी ठेवा रे वतन 
 

मी कोण ?

अरे मी कोन , मी कोन ?
आला मानसाले ताठा 
सरव्या दुनियात आहे 
माझ्याहून कोण मोठा ?

अरे मी कोन , मी कोन ?
बोले भुकेलं मीपन 
 तवा तोंडातला घास 
म्हणे तू कोन तू कोन ?

अरे मी कोन , मी कोन ?
जवा लागली तहान 
तवा पाण्याचा घुटका 
म्हणे तू कोन तू कोन ?

अरे मी कोन , मी कोन ?
लागे ठसका जोरानं 
तवा घशातला सास 
म्हणे तू कोन तू कोन ?

  अरे मी कोन , मी कोन ?
माज्या  मुखी हरिनाम 
तुझ्या जीभेले इचार 
मधी बोले आत्माराम 

सर्व्या दुनियेचा राजा 
 म्हणे तू कोन तू कोन ?
अशा त्याच्या मीपनाले 
मसणात सिव्हासन 

  अरे मी कोन , मी कोन ?
मीपणाची मरीमाय 
देखा इची कशी तऱ्हा
सोता सोतालेच खाय

 
  

देव कुठे

सदा जगाच्या कारनी 
चंदनापरी घसला 
अरे सोतामाधी त्याला 
देव दिसला दिसला 

सोता झाला रे दगड 
घाव टाकीचा सोसला 
अरे दगडात त्याले 
देव दिसला दिसला 

डोये मिटले मिटले 
सोतालेबी इसरला 
अरे अंधारात त्याले 
देव दिसला दिसला 

माले कयालं गुपित 
काय तुझी करामत 
अरे अंधाराने केली 
उजेडाच्या वऱ्हे मात 

देव कुठे देव कुठे ?
तुझ्या बुबुया मझार
देव कुठे देव कुठे ?
आभायाच्या आरपार 
 

अंधार

नही दियामाधी  तेल 
कशी अंधारली रात
तेल मिये एकदाच 
नेली उंदराने वात 

वात केली चीन्धुकीची 
तेल दियात पडलं 
सापडेना आगपेटी 
घोडं आठे बी आडलं 

सापडली आगपेटी 
आग्यायेतायाची लेक 
आली आली हाती काडी 
लाडानवसाची एक 

शिलगावली रे काडी 
जोत पेटली पेटली 
अन्धाराले भ्यायीसनी 
मेली इझीसनी गेली 
 

योगी आणि सासुरवाशीन

योगी-
बसलो मी देवध्यानी
काय मधी हे संकट 
बाई बंद कर तुझ्या 
तोंडातली वटवट 

माझं माहेर माहेर 
सदा गाणं तुझ्या ओठी 
मंग माहेरून आली 
सासरले कशासाठी ?  

 सासुरवाशीन -
आरे लागले डोहाये सांगे 
शेतातली माटी 
गाते माहेराचं गानं 
लेक येईल रे पोटी 

देरे देरे योग्या ध्यान 
एक काय मी सांगते 
लेकीच्या माहेरासाठी 
माय सासरी नांदते 

देव कुठे देव कुठे 
भरीसनी जो उरला 
अरे उरीसनी माझ्या 
माहेरात सामावला 



खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला 
देखा पिलासाठी तिनं 
झोका झाडाले टांगला 

पिलं निजली खोप्यात 
जसा झुलता बंगला 
तिचा पिलामधी जीव 
जीव झाडाले टांगला 

सुगरीन सुगरीन 
अशी माझी रे चतुर 
तिले जल्माचा सांगाती 
मिये गण्यागम्प्या नर 

खोपा इनला इनला 
जसा गिलक्याचा कोसा 
पाखराची कारागिरी 
जरा देख रे माणसा

तिची उलूशीच चोच 
तेच दात, तेच ओठ 
तुले देले रे देवानं 
दोन हात दहा बोटं 
 

मोट हाकलतो एक

येहेरीत दोन मोटा 
दोन्हीमधी पाणी एक 
आडोयाले कना, चाक 
दोन्ही मध्ये गती एक 

दोन्ही नाडा समदुर 
 दोन्हीमधी झीज एक
दोन्ही बैलांचं ओढणं 
दोन्हीमधी ओढ एक

उतरणी चढणीचे 
नाव दोन धाव एक 
मोट हाकलतो एक 
जीव पोसतो कितीक 

देव अजब गारोडी

धरीत्रीच्या कुशीमधी 
बी बियानं निजली 
वऱ्हे पसरली माटी 
जशी शाल पांघरली 

बी टरारे भुईत
सर्वे कोंब आले वऱ्हे 
गय्ह्रले शेत जसं 
अंगावरती शहारे 

उन वार्याशी खेयता 
एका एका कोम्बातून 
पर्गटले दोन पानं 
जसे हात जोडीसन 

टाया वाजवती पानं 
दंग देवाच्या भजनी 
जसे करती कारोन्या 
होऊ दे रे आबादानी 

दिसामासा व्हये वाढ 
रोप झाली आता मोठी 
आला पिकाले बहर 
झाली शेतामधी दाटी 

कसे वारयानं डोलती 
दाने आले गाडी गाडी 
दैव गेलं रे उघडी 
देव अजब गारोडी 


वाटच्या वाटसरा

वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी 
नशिबी दगड गोटे 
काट्याकुट्याचा धनी 
पायाले लागे ठेचा 
आलं डोयाले पाणी 

वरून तापे उन 
अंग झाले रे लाही 
चालला आढवानी 
फोड आले रे पायी 

जानच पडीन रे 
तुले लोकाच्यासाठी 
वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी 

दिवस ढयला रे 
पाय उचल झट 
असो नसो रे तठी 
तुझ्या लाभाची गोट 

उतार चढणीच्या 
दोन्ही सुखदुखात 
रमव तुझा जीव 
धीर धर मनात 
उघडू नको आता 
तुझ्या  झाकल्या मुठी 
वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी 

माझे भाऊबंद घाइसनि येतीन 
नको धरू रे आशा 
धर एवढ ध्यान 
तुझ्या पायाने जानं 
तुझा तुलेच जीव 
लावनी पार आता 
तुझी तुलेच नाव 

मतलबाचे धनी 
सर्वी माया रे खोटी 
वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी 

वारयाचं वाह्दन 
आलं आलं रे मोठं 
त्याच्यात झुकीसनी 
चुकू नको रे वाट 
  दोन्ही बाजूनं द-या 
धर झुडूप हाती 
सोडू नको रे धीर 
येवो संकटं किती 
येऊ दे रे परीचीती 
काय तुझ्या ललाटी 
वाटच्या वाटसरा वाट बिकट मोठी  

आता माझा माले जीव

अरे रडता रडता 
डोये भरले भरले 
आसू सरले सरले 
आता हुंदके उरले 

आसू सरले सरले 
माझा मालेच इसावा 
आस असवा बिगर 
रडू नको माझ्या जीवा 

सांग सांग धरती माता 
अशी कशी जादू झाली 
झाड गेलं निंघिसनि 
मागे सावली उरली 

देव गेले देवाघरी 
आठी ठेयीसनी ठेवा 
डोयापुढे दोन लाल 
रडू नको माझ्या जीवा 

रडू नको माझ्या जीवा 
तुला रडयाची रे सव 
 रडू हासव रे जरा 
त्यात संसाराची चव 

कुंकू पुसलं पुसलं 
आता उरलं गोन्धन 
तेच देईन देईन 
नाशिबाले आवतन 

जरी फुटल्या बांगड्या 
मनगटी करतुत 
तुटे मंगय्सुतर 
उरे गयाची शपथ 

नका नका आयाबाया 
नका करू माझी कीव 
झालं माझं समाधान 
आता माझा माले जीव 
 

लपे करमाची रेखा

लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खाली 
पुशिसनी गेलं कुंकू 
रेखा उघडी पडली 

 देवा, तुझ्याबी घरचा 
झरा धनाचा आटला 
 धन रेखाच्या च-यानं 
  तयहात रे फाटला 

बापा, नको मारू थापा 
असो ख-या असो खोट्या 
नही नशीब नशीब 
तयहाताच्या रेघोट्या 
 
 अरे नशीब नशीब 
 लागे चक्कर पायाले 
नशिबाचे नऊ गिऱ्हे 
 ते भी फिरत राह्यले 

राहो दोन लाल सुखी 
हेच देवाले मागनं 
त्यात आलं रे नशीब 
काय सांगे पंचागन 

नको नको रे जोतिशा 
नको  हात माझा पाहू 
माझं दैव माले कये 
माझ्या दारी नको येऊ. 

देनं घेणं

नको लागू जीवा, सदा मतलबापाठी 
हिरिताचं देनं घेणं नही पोटासाठी 

उभे शेतामधी पीक 
उन वारा खात खात 
तरसती, केव्हा जाऊ 
देवा भुकेल्या पोटात 

पेटवा रे चुल्हा आता, मांडा ताटवाटी 
 नको लागू जीवा, सदा मतलबापाठी

पाहीसनी रे लोकाचे 
यवहार खोटे नाटे 
तवा बोरी बाभयीच्या 
आले अंगावर काटे 

राखोयीच्यासाठी झाल्या शेताले कपाटी 
नको लागू जीवा, सदा मतलबापाठी 

किती भरला कनगा 
भरल्यानं होतो रिता 
हिरिताचं देनं घेणं 
नाही डाडोराकरिता 

गेली देही निन्घीसनी नाव रे शेवटी 
नको लागू जीवा, सदा मतलबापाठी

माझी माय सरसोती

माझी माय सरसोती 
माले शिकवते बोली 
लेक बहिनच्या, मनी 
किती गुपितं पेरली 

माझ्यासाठी पांडुरंगा 
तुझं गीता-भागवत 
पावसात समावतं 
मातीमधी उगवतं 

अरे देवाचं दर्सन 
झालं झालं आपसूक 
हिरीदात सुरुय्बापा 
दाये अरुपाचं रूप 

तुझ्या पायाची चाहूल 
लागे पानापानामधी 
देवा तुझं येनंजानं 
वारा सांगे कानामधी 

फुलामाधी सामावला 
धरत्रीचा परिमय 
माझ्या नाकाले इचारा 
नथनिले त्याचं काय 

किती रंगवशी रंग 
रंग भरले डोयात 
माझ्यासाठी शिरीरंग 
रंग खेये आभायात 

धरती मधल्या रसानं 
जिभ माझी सवादते 
तवा  तोंडातली चव 
पिंडामधी ठाव घेते 

माझ्या जीवा


जीव देवाने धाडला जल्म म्हणे आला आला
जेवा आलं बोलावनं मौत म्हणे गेला गेला

दिस आला कामामधी रात नीजमधी गेली
मरणाची नीज जाता जल्माची जाग आली

नही सरलं सरलं जीवा तुझ येनं जानं
जसा घडला मुकाम त्याले म्हणती रे जीनं

आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर
अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर

येरे यरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीचं रूप

ऐक ऐक माझ्या जीवा पीड्लेल्याचं कन्हनं
देरे गान्जाल्याले हात त्याचं ऐक री म्हननं

अरे निमानतोंडाच्या वढ पाठीवरे धांडा
नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेन्डा

हास हास माझ्या जीवा असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या तोंडावरे कायं फास

जग जग माझ्या जीवा असं जगनं तोलाचं
उच्च गगनासाराख्या धरत्रीच्या रे मोलाचं




कशाले काय म्हनू नही


बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनू नही
हरी नामाइना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वाऱ्याने हाललं त्याले पान म्हणू नही
नही ऐके हरिनाम त्याले कान म्हणू नही


पाटा येहेरीवाचून त्याले मया म्हणू नही
नही देवाचं दर्सन त्याले डोया म्हणू नही

निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणू नही
आखडला दानासाठे त्याले हात म्हणू नही

ज्याच्यामध्ये नही पानी त्याले हाय म्हणू नही
धावा ऐकून अडला त्याले पाय म्हणू नही

येहेरीतून ये रीती तिले मोट म्हणू नही
केली सोताची भरती त्याले पोट म्हणू नही

नही वळखला कान्हा तिले गाय म्हणू नही
जीले नही फुटे पान्हा तिले माय म्हणू नही

अरी वाटच्या दोरीले साप म्हणू नही
इके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हणू नही

दुधावर आले बुरी तिले साय म्हणू नही
जिची माया गेली सरी तिले माय म्हणू नही

इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नही
जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही

ज्याच्यामधी नाही भाव त्याले भक्ती म्हनु नही
ज्याच्यामधी नाही चेव त्याले शक्ती म्हणू नही


येळीमाय

आशी कशी वो येळी माये, आशी कशी येळी

बारा गाडे काजळ कुंकू
पुरलं नही लेनं
साती समदुरचं पानी
 झालं नही न्हानं
आशी कशी वो येळी माये, आशी कशी येळी

धरतॆवरलं चांदी सोनं
दागिन्याची  तुट
आभायचं चोयी लुगडं
तेभी झालं थिट
आशी कशी वो येळी माये, आशी कशी येळी

इडा पीडा संकटाले
देल्हा तुने टाया
झाला तुझ्या गयामंधी
नरोंडाच्या माया
आशी कशी वो येळी माये, आशी कशी येळी

ब्रम्हा इस्नु रुद्र बाळ
 खेलईले वटी
कोम्हायाता फुटे पान्हा
गानं  आलं व्हटी
आशी कशी वो येळी माये, आशी कशी येळी

नशीबाचे नऊ गीऱ्हे
काय तुझ्या लेखी
ग्र्हनाले खाइसनि
कशी झाली सुखी
आशी कशी वो येळी माये, आशी कशी येळी


नऊ झनासी खाऊन गेली 
सहज एक्या गोष्टी 
दहाव्याशी खाशीन तेव्हा 
कुठे राहीन सृष्टी
आशी कशी वो येळी माये, आशी कशी येळी

माहेर

बापाजीच्या हावेलीत 
येती शेट शेतकरी 
दारी खेटराची रास 
घरी भरली कचेरी 

गावामधी दबदबा 
बाप महाजन माझा 
त्याचा काटेतोल न्याव 
जसा गावामधी राजा 

माय भिमाई माउली 
जशी आंब्याची सावली 
आम्हाइले केलं गार 
सोता उन्हात तावली 

तुझे भाऊ देवा घरी 
नही मायबाप तुले 
तुले कशाचं माहेर 
लागे कुलूप दाराले 

भाऊ घमा गाये घाम
गना भगत गनात 
घना माझा लिखनार 
गेला शिकायाले धुयात 

आम्ही बहिणी आह्यला 
सीता तुयासा बहिणा 
देल्या अशिलाचे घरी 
सगेसोइ मोतीदाना 

लागे पायाला चटके 
रस्ता तापीसानी लाल 
माझ्या माहेरची वाट 
माले वाटे मखमल 

जीव व्हतो लाही लाही 
चैत्र वैसखाच उन 
पाय पडता लौकीत 
शीन जातो निंघीसन 

तापीवानी नाही थडी 
जरी वाहे थोडी थोडी 
पाणी लौकिचं नित्तय 

 त्याले अम्रीताची गोडी

माहेरून ये निरोप 
सांगे कानामंधी वारा 
माझ्या माहेरच्या खेपा 
लौकी नदीले इचारा