मन वढाय वढाय

मन वढाय वढाय,
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला,
फिरी येतं पिकांवर.

मन मोकाट मोकाट,
त्याले ठायी ठायी वाटा.
जशा वार्यानं चालल्या,
पानावर्हल्यारे लाटा.

मन लहरी लहरी,
त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन.

मन जह्यरी जह्यरी,
याचं न्यारं रे तंतर
आरे इचू साप बरा,
त्याले उतारे मंतर.

मन पाखरू पाखरू,
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर,
गेलं गेलं आभायात.

मन चप्पय चप्पय,
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज,
आलं आलं धर्तीवर.

मन एवढं एवढं,
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं?
आभायात बी मायेना.

देवा, कसं देलं मन,
आसं नही दुनियात  
आसा कसा रे तू योगी,
काय तुझी करामत.

देवा, आसं कसं मन?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले,
असं सपनं पडलं.

अरे संसार संसार


अरे, संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके,
तव्हा मिळते भाकर.


अरे, संसार संसार
खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले,
लोटा कधी म्हनू नहीं.


अरे, संसार संसार,
नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार,
म्हनू नको रे लोढनं.


अरे, संसार संसार,
खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू,
बाकी अवघा लागे गोड.


अरे, संसार संसार,
म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल,
मधी गोडंब्याचा ठेवा.


देखा संसार संसार,
शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे,
मधी चिक्ने सागरगोटे.

ऐका, संसार संसार,
दोन्ही जीवांचा इचार
देतो दुःखाले होकार,
अन्सुखाले नकार.


देखा, संसार संसार,
दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार,
सुखदुःखाचा बेपार .


अरे, संसार संसार,
असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर,
त्याच्यावरती मदार.


असा, संसार संसार,
आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार,
मग जीवाचा आधार .

मानूस

मानूस मानूस,
मतलबी रे मानसा
तुले फार हाव,
तुझी हाकाकेल आशा.

मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं,
गोठ्यातलं जनावर.

भरला डाडोर,
भूलीसनी जातो सूद
खाइसनि चारा,
गायम्हैस देते दूध.

मतलबासाठी,
मान मानूस डोलाये
इमानाच्यासाठी,
कुत्रा शेपूट हालाये.

मानसा मानसा,
कधी होशील मानूस
लोभासाठी झाला,
मानसाचा रे कानूस!